Monday, April 21, 2025

खूप दिवस झाले काही तरी लिहून. तस लिहाव सांगाव अस खूप काही साचलेलं असूनही लिहायला निवांत असा वेळ मिळत न्हावता. पण आज मी एक असा चित्रपट पहिला की सगळी कामे बाजूला ठेऊन मला त्याच्या बद्दल लिहावच लागल. 

Netflix च्या कृपेने वेगवेगळ्या भाषेतले अनेक उत्कृष्ट चित्रपट अगदी रिमोटच्या एका बटणावर आले आणि अलीबाबाची गुहाच जणू खुली झाली. 

इतके दिवस TRP च्या so called calculation मध्येच बसणारे चित्रपट TV वर लागायचे. त्यात “south” चे पिक्चर अत्यंत सुमार दर्जाचे, अतिरंजित, आणि कणा नसलेले बायकी नायक असलेले. नायक नायिकेच्या भोवती त्यांच्याच बरोबरीने वेडेचाळे करणारे सहकलाकार. दोन चार चित्रपट बघून हे मत मी बनवून घेतलं होत. त्यामुळे थोडी भाषा वेगळी ऐकली की लगेच चॅनेल बदलायचे.(हल्ली हे मत मराठी films ना लागू होतय).

असो… नमनाला घडाभर तेल वाहून झालय त्यामुळे मूळ विषयाकडे वळते. Court, state vs a nobody अस या तेलगू चित्रपटाचं नाव. नावावरून हा courtroom drama असेल हे कळत. आणि आहेच तो तसा. एक १७ वर्षाची नुकतीच वयात येणारी तरुणी, जाबिली आणि आत्ता आत्ताच मोठं झाल्याची फीलिंग आलेला नुकतच मिसरूड फुटलेला एक १९ वर्षाचा तरुण, चंदू. दोघांमध्ये एक खट्याळ निरागस प्रेम फुलतय. 

इतर प्रेमकहाणी मध्ये असते तशी सामाजिक आर्थिक दरी या ही जोडीच्या नशिबी. पण हे गुलाबी वयच अस की.. गुंतता हृदय हे… प्रेमाशिवाय बाकी कसलाही व्यावहारिक विषय आसपासही फिरकत नाही. तिचं याच्या घरी येणं जाणं त्याच्या वडिलाना सोडून सर्वांना माहीत. तिच्या घरी मात्र कोणालाही याची खबर नाही. 

जाबिलीचे वडील वारलेले आणि घरात मोठं खंबीर पुरुष माणूस नसल्याने, घरावर वरचश्मा मिळालेला एक विकृत आणि अहंकारी जावई. घरातले सर्वजण अगदी दाबून असतात. स्त्रियांवर so called संस्कार करण्याचा स्वयंघोषित अधिकार असल्या सारखी वागणारी, चाबकाने भर चौकात फटके मारण्याची लायकी असणारी एक मनोवृति आहे तिचा हा प्रतिनिघी. (याने संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत माझ्याकडून खूप शिव्या खाल्लेल्या आहेत).

तर एक दिवस चुकून याला आपल्या नायक नायिकेबद्दल कळत. आता माझ्या घराण्याच्या इज्जतीची जबाबदारी माझी आहे या थाटात तो चंदूच्या घरी धडकतो . नुसता येत नाही तर येताना सोबत जबिलीची आई, आजोबा आणि पोलिसना घेऊन येतो. पॉक्सो कायद्यानुसार एक full proof केस बनवून. अनेकना manage करून. आणि चंदूच्या दुर्दैवाने जबिली नेमकी तेव्हाच  त्याच्या घरात आलेली असते. 

पोलीस त्याला पकडून नेतात. watchman असलेल्या वडिलांचे police station मध्ये कोणीही काही ऐकत नाही आणि चंदू रिमांड मध्ये अडकतो. कोर्टात केस उभी राहते आणि हा हा म्हणता म्हणता चंदू पार गळ्यापर्यंत अडकतो. त्याला वाचवणारं कोणीही नाही. आशेचा एकही किरण दिसत नाहीये. 

आता न्यायाधीश सोमवारी अंतिम निर्णय सुनावणार असतात, तो चंदूच्या विरुद्ध जाणार हे स्पष्ट दिसत असताना, आदल्या शुक्रवारी एक होतकरू वकील त्याचा पहिला ब्रेक थ्रू म्हणून ही केस घेतो. आणि… या पुढचा चित्रपट आवर्जून पाहण्या सारखा आहे. 

प्रेक्षकांना पहिल्या frame पासून शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाय हा चित्रपट. आणि शेवटी अंतर्मुख करतो. अनेक स्तरांवर विचार करायला भाग ही पाडतो. प्रामाणिकपणा, निरागसता आणि विकृती. एक समाज म्हणून खरच आपण प्रगल्भ होतोय? आपल्या मनात सतत जगणाऱ्या, दुसऱ्याना judge करणाऱ्या न्यायाधीशाची खरी गरज कोणाला आहे? हे असे अनेक प्रश्न उभे करून चित्रपट संपतो. 

एकदातरी वेळ काढून बघण्या सारखा चित्रपट…. Court, state vs a nobody…

Thursday, March 20, 2025

Awakening..

 प्रत्येक कलाकृती एक स्वतंत्र अनुभव असते. मग ती एखादं गाणं असेल, एखादा लेख किंवा अगदी एखादा चित्रपट सुद्धा. जितकी उत्कट अभिव्यक्ती तेवढाच दमदार आस्वाद. आणि मग त्या कलाकृतीला ना कुठल्या सीमेचं बंधन असतं ना हि भाषेचा अडसर. आता OTT च्या कृपेने अनेक भाषेतले अनेक देशातले चित्रपट कधीही पाहता येऊ लागले आणि कळलं कि त्या टिपिकल sci-fi किंवा मारधाड,हिंसा असलेल्या उथळ सिनेमां पेक्षा वेगळं अस त्यांच्या कडेही आहे सांगण्या सारखं. खूप

असंच काही नवीन वेगळं शोधताना एक चित्रपट सापडला. awakening नावाचा. वैद्यकीय विषयांची आवड असल्याने मी तो पाहायला घेतला. थोडा संथ आणि फार काही ट्विस्ट वगरे नसलेला एक तब्बल ३५ वर्षांपूर्वी आलेला अमेरिकेन चित्रपट. एका एकाकी मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्या मनोरुग्णांची कथा. catatonia, म्हणजे मेंदूला अजिबात शारीरिक हालचाल जमत नाही आणि मन मात्र सगळं नोटीस करतं. त्यावर कोणताही औषध नसतं. एकदा एका सेमिनार मध्ये या आपल्या डॉक्टर ला एक आशेचा किरण सापडतो. एक औषध जे या रुग्णांवर काम करू शकेल असं. तो प्रयोग करतो एकावर आणि तो यशस्वी हि होतो.

लिओ नावाचा एक रुग्ण या कॅटाटॉनिक स्टेट मध्ये लहान असताना गेलेला असतो तो तब्बल २५-३० वर्षांनी "जागा" होतो. मधल्या काळात जग फार बदललेलं असतं. लिओ ते "जागेपण" अनुभवायला सुरु करतो. या जाग्या झालेल्या लिओ च्या तोंडी एक फार सुरेख वाक्य येतं, "we have got to remind them, how good it is, what life is all about. They have forgotten what it is to be alive. They need to reminded about what they have and what they can lose. What I feel is the joy of Life, the Gift of life, the freedom of life. People don’t appreciate simple things of life.

किती अचूक म्हणालाय लिओ बघा. लोक जगणं काय आहे ते विसरून गेली आहेत. त्यांना आठवण करून देऊया कि आयुष्य किती सुंदर आहे. एखादी गोष्ट गमावल्यावरच त्याची किंमत कळते ना तसच काहीसं. रोजच्या धावपळीतून जराशी सवड काढून आजूबाजूला पाहिलं तर जाणवतं. अश्या कितीतरी सुंदर गोष्टी फक्त रोज आणि सहज घडतात म्हणून त्यांचं तिथे असणं आपण नकळत गृहीत धरत जातो. "रुटीन" नावाच्या डब्यात टाकून मोकळे होतो. आणि मग जायचा दिवस जवळ येऊन ठेपतो आणि तेव्हा कळतं, अरेच्च्या, जगण्याच्या धावपळीत खरं जगायचं राहूनच गेलं.

ज्ञानेंश्वर माउलींनी वृद्धावस्थेच अतिशय दारुण वर्णन करून म्हटलंय कि ,देवा, तेव्हा मला तुझा नाव आठवण्याची हि शक्ती नसेल म्हणून मी आत्ताच जेव्हा धडधाकट असताना तुझी भक्ती का करू नये. हा चित्रपट सोप्या शब्दात हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपटातल्या मानसोपचार तज्ञालाही हा विचार पटतो आणि मग त्याच्या आयुष्य एक सुरेख वळण घेतं आणि चित्रपट संपतो. कधी वेळ मिळाला तर शांतपणे पहा आणि मग होऊन जाऊदे..

संवाद मनाचा मनाशी...   

 

 तब्बल १६ वर्षापूर्वी हौस म्हणून बनवलेला ब्लॉग आज परत अचानक उघडून बघितला. आणि जुन्या आठवणी परत एकदा घेरून बसल्या. 

तेव्हा वाचायचं वेड अगदी भरात होत आणि माझ्या हातून कधी काळी काही लेखन होईल अशी पुसटशीही कल्पना केली न्हवती. वर्तमानपत्रात काही फुटकळ पत्र आणि मराठी संकेतस्थळावर थोड्या फार प्रतिक्रिया, इतकंच काय ते प्रसिद्ध झालेल लेखन. लिहिण्याची कितीही इच्छा असली तरी पेन हातात धरल्यावर नक्की कशावर लिहायच ते न सुचल्याने आमची गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून अडलेली होती. 

अस म्हणतात की देवाने हे जग बनवलं आणि मग स्वतःची सुंदर निर्मिती पाहून त्याला आनंद झाला. हा आनंद कोणाला तरी सांगावा म्हणून त्याने स्वतःतून मनुष्याची निर्मिती केली. एकोहम बहुअस्या… 

मलाही हा आनंद वाटायचाय.. खूप सारी पुस्तके वाचली, लहानपणापासून निसर्गाच्या अगदी कुशीत वाढले अस म्हंटल तरी चालेल इतक झाडाझुडपात रमले. मोठी झाल्यावर शहरात आल्यावर कळल की जे आपण अनुभवलं ते फार अनमोल होत.. आणि ते मला आता तुम्हाला सांगवस वाटतय… 

त्यासाठी हा ब्लॉगप्रपंच… 

फेसबुक आणि इंस्टा वर जस मला तुम्ही भरभरून प्रोत्साहन दिलत, तसंच इथेही द्या, अशी थोडी मैत्रिपूर्ण हक्काची विनंती…..

Wednesday, March 19, 2025

अळंबी किंवा मशरूम भाद्रपद महिन्यात उगवायचे. शेताच्या बांधावर नारळाच्या बुडाशी. आम्ही त्याना गमतीने कुत्राच्या छत्र्या म्हणत असू. बालपणीच्या असंख्य गैरसमजापैकी एक हा पण. भू भू ने शू केली म्हणून उगवतात असं वाटायचं..


तर अशी अळंबी उगवली की आई त्याची मस्त मिरचीच्या फोडणीवर भाजी बनवायची. खूप सुरेख लागायची पण मनात असलेल्या गैरसमजामुळे खाताना कसतरी वाटत रहायचं. अगदी आई बोलतेय म्हणून खायचं.

या अश्या केवळ आई बोलते म्हणून पोटात ढकलल्या गेलेल्या पदार्थांत शेवळाची आमटी, अळूची पीठ लावून केलेली आमटी, अळंबी ची भाजी, केळफूलाची भाजी अस सगळं यादी फार मोठी आहे.

आणि आता इतक्या वर्षांनी टेबलाच्या या बाजूला आल्यावर तिची ती कळकळ थोडीफार समजायला लागलीये… भूमिकां बदलल्या, दृष्टी बदलली किवा अस म्हणू की जास्त व्यापक झाली. हे असे अनवट पदार्थ दाटावून खायला घालण्यामागे आमच्या आरोग्यविषयक उद्देश तर होताच पण त्याहूनही जास्त पदार्थांच्या चवीचा एक नितांत सुंदर अनुभव जो तिने घेतला होता तो आमच्या बरोबर शेयर करण्याचा तिचा एक प्रयत्न होता..

हे फार उशिरा लक्षात आलं, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्तीनुसार आता हळू हळू समजतेय. आणि जसं मला समजलं तसं ते माझ्या मुलांना 
ही समजेल हे जाणवून निवांतपणा ही आलाय.

रस्ता


रस्त्याने प्रवास परत सुरु करुन आता वर्ष दीड वर्ष तरी झालं. आधी कॉलेज मध्ये असताना सतत सायकल नेच सगळी कडे फिरायचे…मी माझी सायकल आणि रस्ता…. नोकरी करायला लागल्यानंतर मात्र रस्ता आणि सायकल दोन्ही सुटलं ते आत्ता आत्ता पर्यंत.

इथे महापे ला यायचं तर सगळ्यात जवळ आणि सोयीस्कर प्रवास म्हणजे रस्त्यानेच. आधी स्कूटर आणि आता ऑटो. पण विरारचा निवांतपणा काही या रस्त्याला नाही. हिरवळ ही अगदी तुरळकच.

पण वर्दळ खूप आणि ट्रॅफिक जॅम तर डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पूजलेला. ज्या दिवशी ट्रॅफिक नसतं तेव्हा आम्हालाच फार चुकल्या चुकल्या सारखं होत…
तर रस्त्याने प्रवास सुरु होऊन, पडून बिडून, हाड मोडून घेऊन झालं. ज्या ऑटो ला शिव्या घातल्या त्यातूनच जायचं नशिबात आलं आणि आजवर जाणवलं नाही अस काही तरी लख्ख उमजलं.

चालणारी वाहने, माणसे, आसपासची दुकाने, घरे, आजूबाजूला असणारी झाडे इतकच कशाला अगदी बाजूला उभ्या असलेल्या होर्डिंग्ज सहित संपूर्ण रस्त्याला एक आत्मा आहे. एक collective soul. त्या आत्म्याला स्वतःची अशी एक अविरत गती आहे आणि त्याच वेळी तो तेवढाच स्थिर ही आहे.

इथे प्रत्येकाचाच एक स्वतंत्र प्रवास चालू आहे. गर्दीत गर्दीच्या बरोबरीने आणि तरीही एकट्याचा असा. माणसांचाच न्हवे केवळ तर वाहनांचा सुद्धा. प्रत्येक गाडी आपल्या मालकाच प्रतिबिंब. त्याच्या परिस्थितीच… मनःस्थितीचं… प्रत्येकाची एक वेगळी कथा…

आणि या अश्या सगळ्या विविधतेची मोळी बांधून चालणारा.. काही नवीन सांगू पाहणारा.. जख्ख म्हाताऱ्या वयात जमा झालेली अनुभवांची झोळीच जणू उपडी करावी तसा अनेक गोष्टी सांगणारा… अनेकांच्या आनंदाचा आणि वेदनेचाही मूक साक्षीदार… असा रस्ता आपल्याला काही तरी सांगतो आहे… लक्ष देऊन ऐका…