Wednesday, March 19, 2025

अळंबी किंवा मशरूम भाद्रपद महिन्यात उगवायचे. शेताच्या बांधावर नारळाच्या बुडाशी. आम्ही त्याना गमतीने कुत्राच्या छत्र्या म्हणत असू. बालपणीच्या असंख्य गैरसमजापैकी एक हा पण. भू भू ने शू केली म्हणून उगवतात असं वाटायचं..


तर अशी अळंबी उगवली की आई त्याची मस्त मिरचीच्या फोडणीवर भाजी बनवायची. खूप सुरेख लागायची पण मनात असलेल्या गैरसमजामुळे खाताना कसतरी वाटत रहायचं. अगदी आई बोलतेय म्हणून खायचं.

या अश्या केवळ आई बोलते म्हणून पोटात ढकलल्या गेलेल्या पदार्थांत शेवळाची आमटी, अळूची पीठ लावून केलेली आमटी, अळंबी ची भाजी, केळफूलाची भाजी अस सगळं यादी फार मोठी आहे.

आणि आता इतक्या वर्षांनी टेबलाच्या या बाजूला आल्यावर तिची ती कळकळ थोडीफार समजायला लागलीये… भूमिकां बदलल्या, दृष्टी बदलली किवा अस म्हणू की जास्त व्यापक झाली. हे असे अनवट पदार्थ दाटावून खायला घालण्यामागे आमच्या आरोग्यविषयक उद्देश तर होताच पण त्याहूनही जास्त पदार्थांच्या चवीचा एक नितांत सुंदर अनुभव जो तिने घेतला होता तो आमच्या बरोबर शेयर करण्याचा तिचा एक प्रयत्न होता..

हे फार उशिरा लक्षात आलं, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या उक्तीनुसार आता हळू हळू समजतेय. आणि जसं मला समजलं तसं ते माझ्या मुलांना 
ही समजेल हे जाणवून निवांतपणा ही आलाय.

No comments: